कैसा दु:खाचा घाला

मराठी

कैसा दु:खाचा घाला माझ्या बाळावरि आला ! सुता पाहुनी खांबावरि जैं मार्या जवळी आली, बहु दु:खें तैं रडतां रडतां कैसी वदती झाली हातीं पायीं बाळक खिळतां जों जों लागति ठोके तों तों माझ्या अंत:करणा जणुं पडताती भोकें ! अहा बाळा ! किती तगमगसी दु:ख तुझें तुज ठावें ! काय करुं मी, मज न पहावें, कोणिकडे मी जावें ! किती ममताळू सुपुत्र माझा खांबावरि जरि आहे, शिष्या म्हणतो, "माता तव ही, रक्षण माझें चाहे मागत असतां पाडस पाणी लोकां बहु विनवूनी, पाणि न देतां आंब पिण्यासी दिलि पित्त्तें मिसळूनी पाहा पाह, पूर्ण म्हणुनि तो जिव सोडीता झाला, परि दुष्टांची तृप्ति न होतां भोंसकिला कुशिं भाला यास्तव, बाळा, पूर्णच केलें, बहु दु:खें सोसूनी परि माझ्या तरवार जिवांतुनि गेली पार निघुनी ! द्राक्षीच्या वेलासीं जैसा घड लोंबे द्राक्षांचा, तैसा त्या खांबाशीं लोंबे जिव माझ्या पक्ष्याचा पाडस चुकतां जशि हरणीची तगमग तगमग होते, तैंसी गत मम झालि, सख्यांनों, दु:ख पाहतां हो तें बाळपणापासून कधींही आज्ञा मोडिलि नाहीं हांकेसरसें धांवुनि येई न वणवि गुण कांही