मराठी
११४ प्रिय सखा येशु
हे माझ्या प्राणप्रिया
दुर्गा , माझ्या आश्रया,
घे घे ओढोनी मला
वक्षी तुझ्या , प्रेमाला !
वारा वेडा जाहला ,
घे घे ओढोनी मला ;
लाटा खाऊ पाहती ,
सांभाळी तू संप्रति ... १
संसाराव्धी क्षोभला ,
ह्यातुनी जाता मला
सांभाळुनी ने तटा,
वारी , ख्रिस्त , संकटा ;
अंती आत्मा हा , प्रिया ,
घे घे ! दावी हि दया ;
मी तुझा , तुझा सदा !
तुझा तुझ्या ने पदा ! ... २
नाही नाही आसरा
तुझ्याविणे दुसरा ;
एकाकी मी , तू जरी
सोडिशी , ख्रिस्ता , तरी ;
माझ्या जीवेशा , मला
सांभाळी, दे शांतीला ;
सारी आशा साह्य रे
तू माझे , ख्रिस्ता , खरे ... ३
घे , माझ्या घे मस्तका ;
पंखी झाकी तारका :
कोठे जाऊ ? राहू रे ?
तू माझे सर्वस्व रे !
मी अन्यायी , पातकी ,
निचांचा राजाच कि !
तू सत्याचा , नीतीचा
सिंधू , येशु , प्रीतीचा ! ... ४
नाही प्रेमाला मिती ,
क्षांती, तुझी ती किती !
माझ्या पापांची क्षमा
केली तू , सर्वोत्तम ;
आरोग्याच्य निक्षारा
तू व्यापी ह्या अंतरा;
ठेवी हे तू शुद्ध रे ,
तू माझे सर्वस्व रे ? ... ५
हे अक्षय्या जीवना ,
घेतो तुते पावना ;
येई , राही अंतरी .
सारे सारे तू भारी !
हे अक्षय्या जीवना
येथे पावे वर्धना
वाढोनि काळाप्रती
व्यापी , नाही ज्या मिती ... ६
- ना.वा.टिळक