मराठी
148 पवित्र आत्म्याला केलेली प्रार्थना
पवित्रात्मन अनाद्यन्ता,
अनाविद्धा तुझी सत्ता,
समर्था, तूं जगदूनद्या,
जगा आधी जगद्धयाता ! ... धृ
जगन्नेत्या, तुझी स्फूर्ती
जगाचे हेच चैतन्य,
न ती जेथे तिथे सारे सदा मेले !
सदा शून्य !
तुला सप्रेम अर्पितो जिवा,
देहा, अगा नाथा,
करी सारे, विभो तू !
मी निमित्ताचा धनी आता ... 1
कृपा सर्वांवरी तुझी,
जरी कोणी म्हणे नाही
तरी तो मात्र सोडोनि तिला
पापी दूरी राही;
असा पापी जगी
मी हे पुरे ठाऊक मच्चित्ता,
कसे चोरून ठेऊ हे ?
पुढे सर्वान्तरज्ञाता ! ... 2
जसा आहे तसा आलो,
रित्या पात्रास घे घे या !
कुठे छिद्रे जरी याला,
तरी तू सिद्ध सांधाया,
स्वये आरंभिल्या कार्या
करी संपूर्ण तू, ताता;
नसे झाला, न वा होणे तुझ्या
ऐसा कधी दाता ! ... 3
---- ना. वा. टिळक