मराठी
186 पापी मनुष्याचा अनुभव
हरलों हरलों मी, प्रभू देवा,
कैंची घडे ताव सेवा ... ध्रु
पापांमधिं मन लोळे,
झाल्यावरती उघडती डोळे ... 1
दृढ निश्चय मी केले,
परी ते समयी व्यर्थच गेले ... 2
टोंची विवेक कांटा,
करितां बोध फुटे मज फाटा ... 3
देवळीं नेत्र उघडती,
तेथुनि निघतां झापड पडती ... 4
ऐकूनि कानही किटले,
विटलें मन, परी नाहीं फुटलें ... 5
प्रितिवचन आठवितों
तव परी एकीकडे ठेवितों ... 6
मन हें मज अकळेना,
कळतें या, पण काहीं वळेना ... 7
हें मन बहू बेशरमी,
परी घट किती मारूं या शर मी ! ... 8
तुजविण दुष्ट मनाला
आकळवेना, अनुभव आला ... 9
तार मला, प्रभू आतां,
पापें कबुल करितों, ताता ... 10
--- कृ. र. सांगळे