मराठी
196 पश्चात्ताप
पश्चात्तप्त आत्मा तुझा झाला काय ?
करपला काय काय तुझा ? ... 1
झालें काय जिणें नरकासमान ?
भाररूप प्राण झाला काय ? ... 2
काय अन्नासवें कालवे गरल ?
पेटला अनल शय्येवरी ? ... 3
अनन्य पातकी जगामध्यें मीच,
अनन्य मी नीच वाटे काय ? ... 4
खरें सांग, थोडा तरी मी चांगला
वाटे न तुजला ? नको चोरू ... 5
पाप झालें काय वमनासमान !
नकोसें स्वमन झालें काय ? ... 6
दास म्हणे , आग लागे मीपणाला
पश्चात्ताप झाला सुरु तेथें ... 7
----ना. वा. टिळक
___________________________________________________________________________
197 पुनर्जन्माची आवश्यकता
पुनर्जन्म झाल्याविना
ख्रिस्तकृपा त्या कळेना ... 1
पापासाठीं रडतो अति,
पुनर्जन्माची उपत्ती ... 2
खातां, पितां, वस्त्रें लेतां,
शांती नसे त्याच्या चित्ता ... 3
निजे, बैसे, चाले, बोले,
परी अंतर्याम लुलें ... 4
वर्णवेना तैशी स्थिती,
भकतां आहेच प्रतिति ... 5
शांत होते मन त्याचें
धरितां पाय हो ख्रिस्ताचे ... 6
--- कृ. र. सांगळे