मराठी
201 पापांगीकार व प्रार्थना
हो प्रसन्न, मंदक्रोध वंद्य ईश्वरा,
करुनि कृपा अंगिकार दीन पामरा ..ध्रु
हस्त, पाद, नेत्र, घ्राण, कर्ण, सुख, नरा
इंद्रियेंही दिधलींस काय गोजिरा,
खर्चिली न भक्तांसाठीं ताव परात्परा;
राया, ध्याया, पायां, बेशरमी किंकर मी
पतकरी मी, हे दयाकरा .. 1
भ्रष्ट, दुष्ट, खष्ट, पापी जाहलों पुरा,
तुल्य जरी मी तूं अतुल्य, प्रभू सुधी खरा,
कीं अखंड दंडिलेंस मज न पामरा
सदया न्याया द्याया पाप्याला
कळवळला अवथीला बेत अघहरा ... 2
एकुलता प्रिय पुत्र जो तुझ्या उरा
धरुनी वस्त, दीधलास ख्रिस्त कोकरा,
मरुनि त्यानें खंड भरूनि दिधला पुरा,
येवो, भावो, ठेवो अघहरणी भवतरणी
प्रभूमरणी ही वसुंधरा ... 3
मीं पापें पत्करितो, न्यायसागरा,
ख्रिस्तमरणी धरुनी भाव शरण सुंदरा,
शुद्धात्मा ठेवीं मम हृदयमंदिरा;
तारीं, वारीं, सारीं भयचिंता गुणवंता
भगवंता, देई आसरा ... 4
--- ह. गो. केळकर