मराठी
204. ख्रिस्तस्वीकाराचा अनुभव
ख्रिस्ती झालां का ?
पातकभारा विटलां का ?
अनुतापाचा अनुभव पुरता
आधीं आला का ? ... ध्रु
खांबी गेलां का ?
अर्थहि त्याचा कळला का ?
कळला असला तरी तो
पुरता अंतरीं ठसला का ? ... 1
देहा मेलां का ?
पुनरपि जन्मा झालां का ?
ख्रिस्तच माझें जीवन अक्षय
निश्चय झाला का ? ... 2
प्रेमें भरला का ?
परका कोणी नूरला का ?
जिकडे तिकडे बांधव अपुले
पाहून रमला का ? ... 3
ईश्वर दिसला का ?
अंतरीं बाहिर वसला का ?
तोच आपला मे बाप हा
प्रत्यय आला का ? ... 4
---- ना. वा. टिळक
___________________________________________________________________________________
205 पश्चातापपूर्वक स्वार्पण
शेवटीं, प्रभुराया,
बिलगलो तुझिया पायां;
गेलें रे गेलें माझें
आजवरी जन्म वायां ... ध्रु
तुझा मी शिष्य थोर;
शिष्यधर्मी धुरंधर
वाटलें अभिमानाने;
आतां लाज वाटे फार ... 1
मीपणें फसविले,
तुला मला दूर केलें,
सर्वथा स्वमनाचे,
तुझ्या नांवें दास्य केलें ... 2
मजला बुद्धी नाहीं,
बळ नाहीं, ज्ञान नाहीं;
तूंच रे तूंच माझें
आतां, ख्रिस्ता, सर्व काहीं ! ... 3
मजला दृढ धरीं ,
नको जाऊं देऊं दूरी,
एवढी भीक घाली;
वाट पाहतों मी दारीं ... 4
--- ना. वा. टिळक