मराठी
222 पापहरण करणारा ख्रिस्त
कोण हरील मम पाप ?
तुजविण कोण हरील संताप ? ... ध्रु
ध्यानधारणाजपतप अवघा
निष्फळ झाला व्याप ... 1
विद्याकुलधन सकल साधनें
झाला केवळ शाप ... 2
मित्रबंधुगन नाच ये कामा,
जननी किवां बाप ! ... 3
मज पतितास्तव कवण भरून दे
न्यायाचें हें माप ? ... 4
गळ्यांतला हा कुणि काढावा
मोह भयंकर साप ! ... 5
ख्रिस्ता ! ख्रिस्ता ! कोण ऐकतें
माझा करूण विलाप ? ... 6
--- ना. वा. टिळक