मराठी
235 ख्रिस्तविरहित जीविताची व्यर्थता
ख्रिस्तभक्तिवीण जिणें व्यर्थ तें खरें,
दार तारणासि नाहीं जगीं दुसरें ... ध्रु
सुंदर रूप, विद्या, धन, कीर्ति मिळविली
आत्महिता काय तुवां सोय पहिली ?
मुख्य गोष्ट तीच सदा चुकून राहिली,
परलोकीं कोण तुझा ? पाहीं बा बरें ... 1
बाळपणीं खेळण्यांत मौज वाटती,
अन्न, वस्त्र पुरवी बाप नाहीं तूट ती,
कंठ्या शिरपेंच, हातीं कडीं दाटती,
यापरी वय जात असे नाहीं सोय रे ... 2
तरुणपणीं कांता, सूत, लोभ सुटला,
विषयभरें धुंद सदा, मोह दाटला,
अमर जगीं मीच असा गर्व वाटला,
गेल्यावर वय मग तें बुद्धी न स्फुरे ... 3
वृद्धदशा, विकट आशा पाठीं लागली,
केश शुभ्र, गलित तनू, शक्ति वेंचली,
येशूची कांस आस चित्तीं राहिली,
सत्याचा शोध करीं, सत्पथी फिरे ... 4
--- कृ. र. सांगळे