263 प्रभूला संतोषविणें

मराठी

263 प्रभूला संतोषविणें प्रभूला तोषविण्यास झटावें ... ध्रु अगणित वेळा दु:ख दिलें तरी अजुनी का उलटावें ? ... 1 पश्चातापें शरण रिघावें हृदय तयास पटावें ... 2 त्यजुनी पापें, शुद्धमनोमय भक्तिपटांत नटावें ... 3 प्रभूची इच्छा जाणुनि करणें अक्षर हेंच घटावें ... 4 तारण लोकां कळवावें, कीं आत्मिक दु:ख हटावें ... 5 अनुपम केली प्रीति जयानें कां न तया लगटावें ! ... 6 ---- कृ. र. सांगळे _________________________________________________________________________ 264 मनुष्याचें देवविषयक कर्तव्य निर्मिले देवानें विश्व जण सारें किती उपकारें वेष्टीले त्या ... 1 परी जण सर्व होऊनि कृतघ्न आज्ञा केल्या भग्न ईश्वराच्या ... 2 प्रीती ना करितां दु:ख दिलें अति प्रिय देवाप्रति मानवानीं ... 3 तर दुष्टपणा जाणूनियां आतां पश्चातापें ताता शरण जा ... 4 संपादावी प्रीति, तया तोषबावें, प्रेम गौरवावें, कर्तव्य हें ... 5 गौरव प्रभूचें ज्यांत होतें साचें त्यांतच जनाचें सत्कल्याण ... 6 ------- कृ. र. सांगळे __________________________________________________________________________________________ 265 ईश्वरेच्छा तुझी इच्छा चाले जेथें सर्व सौख्य वैभव तेथें ...1 तेथें सारेंच पवित्र परम आनंद सर्वत्र ... 2 तुझी इच्छा स्वर्गी जैसी प्रवर्तो ह्या जागी तैसी ...3 दास म्हणे, हि विनंती सदा माझी, जगत्पति ...4 ------ ना. वा. टिळक __________________________________________________________________________________________ 266 ईश्वरेच्छेला मान्यता तुझी इच्छा पुढे चाले तिच्यामागें आम्ही बाळें ...1 तुझी शक्ती करी सारें, आम्ही निर्बुद्ध हत्यारें ... 2 तुझें राज्य येवो ऐसें सदा आम्हां लागो पिसें ...3 हीच प्रार्थना असावी, हीच वागणूक व्हावी ...4 तुझ्या राज्यासाठीं छळ सोसूं आम्ही दु:ख हाल ...5 हाच आनंद आमुचा, सत्य वदो माझी वाचा ...6 दास म्हणे, हेंच जिणें तुझ्या राज्याला पाहणें ...7 ------ ना. वा. टिळक __________________________________________________________________________________________ 267 ईश्वरेच्छा शिरसावंद्य मिळो वा न मिळो आम्हां अन्नपाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही ... 1 अंगावर चिंध्या असोत नसोत, तसेंच जगांत राहूं आम्ही ... 2 फुलांचें शयन किंवा कंटकांचें इच्छेनें देवाचे एक आम्हां ... 3 वधस्तंभावर आम्ही टांगलेले, तेथेंच मिळालें सर्व आम्हां ... 4 दास म्हणे ख्रिस्ते केलें आम्हां मुक्त, सेवनीं आसक्त झालों त्याच्या ... 5 ------ ना. वा. टिळक __________________________________________________________________________________________ 268 प्रभूचें सुवंदनीय नाम प्रभूचें सुवंदीत नाम असो ... ध्रु मी नग्न आलो जाईन नग्न, हा बोध मजला ठसो ... 1 प्रभूनेच दिधलें प्रभूनेच नेलें, तरी दोष प्रभूला नसो ... 2 हरएक करणें प्रभूचें यथार्थ; हें ज्ञान हृदयीं वसो ... 3 प्रभू हा दयाळू, प्रिय तात माझा, दृढ भाव ऐसा वसो ... 4 ------ कृ. र. सांगळे __________________________________________________________________________________________ 269 बंधूसहवास बंधूंचें मिळणें, मधुर हें, बंधुंचें मिळणें, जरी देव पाहिजे इथेंच तरी तो भक्तां सापडणें ! ... ध्रु प्रेमळ हीं वदनें मधुतर,प्रेमळ हीं वदनें हीं प्रेमळ वचनें सुधेचाच जणूं पाऊस कोसळणें; हें शास्त्र सांगतें प्रेमाचं ईश्वर पहा, हा अन्य न कोणी परी अपुला बाप हा ह्यासन्निध रमणे हीच आपुली स्पृहा , काय दुजे वदणे ?आणखी काय दुजे वदणे ह्या बंधुसंगमे केलें भूवर स्वर्गाचें येणें ! ... 1 चरितें हीं भी भिन्नने, आपुली चरितें हीं भी भिन्नने, परी सर्व एकतेमधें गोविलीं सुंदरशीं रत्नें, हें केलें ज्यानें अदभूत त्याला स्तवु, श्रीख्रिस्ता हृदयिं पूर्णपणें सांठवूं त्या विश्वबंधूचें यश हर्षें गाजवूं ! इहलोकीं जगणें, यापुढे, इहलोकीं जगणें हें अपुलें म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणें ! ... 2 ----- ना. वा. टिळक __________________________________________________________________________________________ 270 बालसदृश वृत्ती नको नको कांही दुजें मज, देवा, घडो ताव सेवा अहर्निश ... 1 जगाची ह्या चिंता करीं तूंच स्वामी, आपुलीया कामीं ठेवीं मज ... 2 नको मज वित्त, नको मज नावं तुझ्यासाठीं धाव पडो माथां ... 3 चाकर मोलाचा नको मज करूं, तुझें मी लेकरूं ख्रिस्तद्वारां ... 4 लेकुरपणा हा वाढताच राहो, सदा पुअर वाहो आनंदाचा ... 5 तुझ्या काजीं माझें जिणें हे सरावें हेंच मज द्यावें कृपादान ... 6 दास म्हणे, बापा, आतां हीच आशा, इतर विनाशा हेतू जावो ... 7 --- ना. वा. टिळक __________________________________________________________________________________________ 271 देवाच्या पायी चित्त ठेवणें कोणी वांदा, कोणी निंदा, आहे आम्हां अमुचा धंदा ... 1 नाहीं कर्तव्य कोणाशीं, मागूं आम्ही ख्रिस्तापाशीं ... 2 नाहीं जगाचें ऐकत, असे ख्रिस्ताला ऐपत ... 3 दास म्हणे होवो काहीं माझे चित्त त्याच्या पायी ... 4 ---- मा. कृ. उजगरे