मराठी
२८६ ख्रिस्तसहवास
तूंच सेवा सांगणारा,
तूंच करोनि घेणारा ... 1
मन राहो आज्ञांकीत
सारें सारें आलें यांत ... २
जिवा तुझा निदिध्यास,
मुखीं प्रार्थनेचा घोष ... ३
तुझ्या पायी दृष्टी जोड
पुढें पाऊल हें पडो ... ४
संगें माझिया संतत
माझा प्रभू येशू ख्रिस्त ... ५
भीत नाही मी कोणाला,
चारही खंड पृथ्वीला ! ... ६
मी तो कोणी नाहीं, नाहीं,
तूंच, बापा, सर्व कांही ! ... ७
दास म्हणे, हीच श्रद्धा
सदा राहो जशी सध्यां ... ८
----- ना. वा. टिळक