मराठी
२९० प्रभूचा सहवास
तव सहवास घडावा,
प्रभू रे, क्षणभर विरह नसावा ... ध्रु
राहो सुंदर सदनीं नगरीं,
किवां रानीं पर्वतकुहरी
देह, विभो, हा माझा,
कोठेहीं मग स्वर्गच जिवा ... १
मिळोत षडस अन्ने खाया,
कंदमुळें वा मज, प्रभुराया
तूं जवळी मम असतां
अमृतानुभवच मज तो व्हावा ... २
मृदुल फुलांची सुखकर शय्या,
किंवा प्रस्तरखंड निजाया,
हृदया तव टेंकोनी असतां,
कष्ट न शब्दहि ठावा ... ३
हे प्रिय कंदा सर्व सुखाच्या,
घे घे माझें तनमनवाचा
ख्रिस्ता ! मत्प्रिय ख्रिस्ता !
अविनाशी तूं मात्र विसावा ... ४
------- ना. वा. टिळक