मराठी
२९६ जेथें ख्रिस्त तेथें स्वर्ग
मनांत, जनात, वनांत कुठेहि
ख्रिस्ताविण कांही दिसों नये ... १
डोळ्यांपुढे प्रभू सदैव दिसावा,
नाहीं तरी व्हावा आंधळा हा ...२
अंधपणे जग नाहीसें होईल,
ख्रिस्तच दिसेल जेथें तेथें ... ३
विद्या ती अविद्या ख्रिस्ताविण सारी
माझा मीहि वैरी ख्रिस्ताविण ... ४
दास म्हणे, माझा ख्रिस्त आहे जेथें
माझा स्वर्ग तेथें सर्वकाळ ... ५
--- ----- ना. वा. टिळक