ख्रिस्त माझा आश्रय

मराठी

३०१ ख्रिस्त माझा आश्रय प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारुं ... १ प्रभू ख्रिस्त माझी नौका नसे आश्रितांना धोका ... २ ख्रिस्त माझा किल्ला गढ, ठार देतो येतां जड ... ३ प्रभू ख्रिस्त माझी वाट जाते स्वर्गलोका नीट ... ४ ख्रिस्त माझा मेंढपाळ करी प्रीतीनें सांभाळ ... ५ ----- कृ. र. सांगळे _____________________________________________________________________________________________ ३०२ प्रभूचा आसरा ईश्वरा, ह्या नरा पामरा दे तव चरणीं निरामय आसरा ... ध्रु आश्रय मजला अनन्यगतिका, मान्य जगी नच दुसरा ... १ योग्य न मी बा तव अनुरागा, तूंच उदार, परात्परा ... २ हे जगदीशा, दयार्णव बापा, दार करून नको लेकरा ... ३ ख्रिस्त जयाचें जीवन त्याचें सर्वच तूं सुखसागरा ... ४ --- ना. वा. टिळक _____________________________________________________________________________________________ ३०३ ख्रिस्तावरील श्रद्धा सुटोत वादळें, उठोत पर्वत, पंचमहाभूत पिंगा घालो ... १ माझिया अंतरी सदा वसणारा तयास हा सारा पोरखेळ ... २ सदाचे सांगाती सामर्थ्य, जीवन नाहीं परिमाण जया नाहीं ... ३ दास म्हणे, माझ्या ख्रिस्तासह मीही तेथें तेथें नाहीं जातों नीट ... ४ ------- ना.वा टिळक _____________________________________________________________________________________________ ३०४ देवाच्या भक्तांची निर्भयता भय काय तया प्रभू ज्याचा रे ? ... ध्रु सर्व विसरली प्रभुमय झाली पूर्ण जयाची वाचा रे ... १ जगांत विचरे उपकारास्तव परी नाच तो जगताचा रे ... २ येथें निर्धन परत्र ज्याचा सर्व धनाचा सांचा रे ... ३ आधिव्याधी मरणावरती पाय अशा पुरुषाचा रे ... ४ ---- ना. वा. टिळक _____________________________________________________________________________________________ ३०५ ईश्वर संकटसमयी आश्रय भक्तांसंगती तो जगपाल आहे संकटीं हो ... ध्रु व्यापी दारिद्र्य जै फार कष्टें करितांना संसार, देतो हृदया धैर्य आधार, सुखें अपार तीं दावी ... १ नाना दु:खे नाना रोग तिडका जर्जर करितां भोग, देई शुद्धात्माउपभोग, करी प्रयोग प्रेमाचा ... २ पापें होतां तळमळ, ताप, सुटतां नैराश्याचा कांप, म्हणतो ईश्वर, मी तव बाप, ख्रिस्तप्रताप पाहा तो ... ३ येतां अरिष्टांचें स्वार, शस्त्रें करितां तीक्ष्ण प्रहार, करितो स्वपंखाणी आधार, प्रेमळ फार बोलुनियां ... ४ जातां मृत्यूखिंडीं पार, तरी तो अरिष्टां न भिणार, कारण संगें जगदुद्धार, उघडील द्वार स्वर्गाचें ... ५ ------ कृ. र. सांगळे _____________________________________________________________________________________________ ३०६ ईश्वराची सत्ता कडाढली वीज, आली अंगावरी, मज दुर सारी तुझा हस्त ... १ आला आला लोंढा, आतां बुडवितो, वळवी तया तो तुझा हस्त ... २ जमीन दुभंग झाली पायांखालीं, मजला उचली तुझा हस्त ... ३ कढा कोसळला, आदळतो शिरी, तयाला निवारी तुझा हस्त ... ४ पंचमहाभूतें खावया धावली, मजला सांभाळी तुझा हस्त ... ५ दास म्हणे, बापा, पडिली विस्मृती, कशाला म्हणती भय याची ... ६ ---- ना. वा. टिळक ___________________________________________________________________________ ३०७ सर्वांची चिंता वाहणारा प्रभू कंप सुटे कां ताव तनुला बघुनी चिंताव्याधीला ... ध्रु उक्ती प्रभूची हि मोलाची स्मरूनि वेची जिणें निजप्रभुकार्याला, नका म्हणू संसार भला ... १ क्षेत्रींची ही बघ कमले, आनंदें डुलतात फुलें, ही तरु नाना चुंबुनी पवना करिती गाना, व्यर्थ करिसी कां दु:खाला? चिंता सर्वांची प्रभूला ... २ भुकमलाहुनी सुंदर कां रंगी नृपाचा अंगरखा ? शलमोनाला नाहीं मिळाला सजवायाला व्यर्थ करिसी कां दु:खाला? चिंता सर्वांची प्रभूला ... ३ खगगण हे का पेरीती? कोण करी त्यांची तृप्ती ? धान्यांचाही संचय नाहीं तरी खग गाई व्यर्थ करिसी कां दु:खाला ? चिंता सर्वांची प्रभूला ... 4 सर्व जगा जो सांभाळी ईश असे, बा, तव वाली चिंतांपाशी कां मग गुतशी ? नच कां गाशी ? व्यर्थ करिसी कां दु:खाला ? चिंता सर्वांची प्रभूला ... 5