मराठी
३०९ प्रार्थना
श्वसन परेशाचें, प्रार्थना श्वसन परेशाचें ... ध्रु
भक्तांच्या हृदयांत संचरें परतोनी जाई,
अंत:करणी प्रेमाग्नीला उत्तेजन देई,
ज्वाला तयाची सुरम्य निर्मल, दिव्या उभी राही,
ह्या हो ज्वालेचें प्रार्थना नाम असे साचें .. १
श्रांत जनाची विश्रांती हि, क्षुब्धाची शांती,
समाधान हें तृषितांचें, हि क्षुधिताची तृप्ती,
खिन्न जनाची नित्य निरामय हर्षसुखप्राप्ती,
उघडी स्वर्गांचें प्रार्थना द्वार पवित्राचें ... २
भावतरुची फुलें प्रार्थना देवाला जेव्हां
भक्त अर्पिती स्वर्गी महोत्सव थोर होय तेव्हां,
दिव्य गान सम रमवि प्रभूला प्रणतांचा धांवा
अश्रू भक्तांचे वर्षती मेघची मुक्तांचे ... 3
--- ना. वा. टिळक