मराठी
३१३ मुलासारखी प्रार्थना
देरे देरे देरे सदा हेच गाणे,
नातरी गाऱ्हाणे संकटाचें ... १
तुझ्यापुढें गावें सदा रडगाणें,
स्तवनें भाषणें स्वप्नी नाही ... २
प्रार्थना हि खरी अक्षरशः खरी,
सुख नाहीं परी येणें कोणा ...३
बापा, लेकरानें अंकारूढ व्हावें,
हसावे बोलावे गोड गोष्टी ... ४
हेंच तुला व्हावें, आम्हां हेंच व्हावें ,
नाम ह्याला द्यावें प्रार्थना हें ... ५
असे कर, अगा प्रेमरूपा, आतां
बालकांना चिंता अन्य नको ... ६
देशील ते खावें, देशील ते ल्यावें,
सन्निध रंगावें तुझ्या सदा ... ७
संकटें कशाची तुझ्या लेकरांना ?
उगा ह्या कल्पना गांजिताती ... ८
तुझें नाम चित्ती, गौरव मुखांत,
प्रार्थनेचा अर्थ हाच असो ... ९
दास म्हणे, बापा, हेंच रे मागणें
तुजला सांगणें कां हे नको ... १०
--- ना. वा. टिळक
_____________________________________________________________________________
३१४ फलदायी प्रार्थना
करा प्रार्थना अखंड,
नका पडूं देऊं खंड ... १
होतां प्रार्थना विश्वासें
येतें अंत:करणा हसे, ... २
प्रार्थनेचें मोठें बळ,
नाशी संकटां समूळ ... ३
प्रार्थनेनें देवमैत्री
होती जैसी पत्रोपत्री ... ४
येतो प्रार्थनेचा त्रास
होतां सैतानाचा वास ... ५
----- कृ . र. सांगळे