मराठी
३१९ दुःखितांसाठी प्रार्थना
हे प्रभो शांतवन कर ये,
या दुःखित पापीजनाचें ... ध्रु
दारिद्र्ये पीडित दीनें
उपवासी निजती कोणी,
गतधवां पोरकी फिरती
करोनिया मुखें किलवाणी,
रोगांनी दुःखित होता,
तळमळती आपुल्या स्थानीं,
ते करिती पाणी पाणी,
परी द्याया नाहीं कोणी,
प्रभुराया, ये धांवोनी,
ओरडती प्रेमळ वाचे ... १
पपानें होऊन दुःखी
तगमगती ज्यांचे प्राण,
आम्हांस्तव प्रभूला दुःखे,
म्हणुनी जे रडती जाण,
मार्गात घसरल्यामुळें
अंतरी ज्यां लागती बाण
ते निराश भारी होती
क्षणभरही नसे विश्रांती
होईल का ईश्वरप्राप्ती
चिंतेत अशा जीव ज्यांचें ... २
तुजसाठी पडती बंदी,
फटके कीं खाती मार,
तरवारी, बंदुका, वरच्या,
यांनी जे अति बेजार,
घायांनी तिडीक उठता
कासावीस होती फार,
दे अशा शांतीचा घुटका,
जवळी रहा पळ पळ घटका,
याला क्लेशातूनी कर सुटका,
पाहुनी दुःख दीनांचे ... ३
देवावर प्रीती कमती,
म्हणुनी ज्यां खेद अपार,
प्रार्थना पोथीचा चटका
लागाया झटती फार,
रात्रंदिन जे श्रम करिती
व्हाया स्वच्छास्त्रप्रसार,
तुजवांचुनी हे श्रम व्यर्थ,
लवकर ये दाखिव अर्थ
भ्रम काढ जनाचा तूर्त,
होऊ दे राज्य ख्रिस्ताचे ... ४
किती वेळा येऊनि द्वारा
तूं प्रीतीनें ठोकिलें,
परी आम्ही दुष्ट होऊनियां,
द्वेषानें धिक्कारिले,
तरी किती ममताळू बा रे,
ठोकिता नाही सोडिलें,
अपराध घाल पोटांत,
मरणार आम्ही निमिषात,
कां जाऊं देशी नरकांत ?
दे उत्तर तूं विनतीचें ... ५
------- कृ. र. सांगळे
___________________________________________________________________________
३२० सुनिश्चय
माझा झालाची हा निश्चय,
सेवा देवाची मी करिन,
भक्तांचा तोच सदाश्रय,
तयाच्या पायां मी धरीन ... १
प्रभूवरी करुनि प्रेम
त्याचा मानीन अधिकार,
हर्षाने पाळुनियां नेम,
ते भारी नाही मोजणार ... २
माझ्या सदाचारावरून
होवो प्रकाश दुर्जना,
तेणें बहुत सुधरून
लागोत देव अर्चना ... ३
थकु नये सन्मार्गी मी,
तोचि धरावा सर्वकाळ,
हे देवा बाप्पा, नेहमी
माझा करी तू प्रतिपाळ ... ४
-------- एच. बॅलेएनटाईन