मराठी
३३३. हातीं धरून नेणारा प्रभू
प्रभूच वाट दाखवी,
स्वता मला तो चालवी,
सुचे मना जै का विचार
तैं वाटे समाधान फार ... १
तो चालवी, तो चालवी,
मला स्वहस्तें चालवी,
मी त्याला मान्य सर्वस्वी
प्रभूच स्वतां चालवी ... ध्रु
कधीं हर्षाच्या समयिं
कधी क्लेशांच्या प्रलयी,
सुखांत कि दुःखांत मी
तो चालवितो नेहमीं ... २
मी हात त्याचा धरितों,
संतुष्ट आत राहतो,
तो हर्षवि कीं दुखवी,
तरी प्रेमाने चालवी ... ३
संपेल जेव्हा माझी धांव
जै होई माझा पूर्ण भाव,
तैं मृत्यूतीरी न भिणार,
प्रभूच चालविल पार ... ४
---- मेरी इ. बिसल