मराठी
३७०. नम्रतेपासून लाभ
होई होई रे, मानवा, नम्र होई रे,
गर्व टाकुनी लवकरी घरीं सोइ रे ... ध्रु
नम्र मनुष्य आवडे सर्व लोकां रे,
गार्विष्ठाचीया कामाला बसे झोका रे ... १
अंत:करण जयांचे फ़ुटलेलें रे,
वस्ती करितो त्यामध्यें प्रभू बोले रे ... २
धरी स्वभाव जो कोणी लेकराचा रे,
स्वर्गी प्रवेश होईल साच त्याचा रे ... ३
लिनपणाचा जर कित्ता तुज व्हावा रे,
ख्रिस्त प्रभू हा सद्गुरू स्वीकारावा रे ... 4
----- कृ. र. सांगळे
______________________________________________________________________________
३७१. गर्वापासून तोटे
सोडी सोडी, रे मानवा, गर्व सोडीं रे,
अभिमानाच्या टाकुनी देई खोडी रे ... ध्रु
गर्व धरितां तो पाहा दिव्य दूत रे,
दूतपणाला मुकुनी होई भूत रे ... १
हावा जाउनी निषिद्ध झाडाखाली रे
फळ भक्षुनि पतीसह भ्रष्ट झाली रे ... २
देव नाहींच नास्तिक म्हणताति रे
गर्व धरुनी हताश नरका जाती रे ... ३
गर्विष्ठांला बा ईश्वरें केलें खाली रे
ऐशी प्रमाणे शेकडों फळा आली रे ... ४
----- कृ. र. सांगळे
______________________________________________________________________________
३७२. सांसारिक चिंतेचा निषेध
करूं नका चिंता व्यर्थ या जिण्याची,
खाण्याची, पिण्याची, वस्त्राचीही ... १
अन्नाच्या परीस जीवन बा थोर,
वस्त्रांपेक्षां देह फार मोठा ... २
पक्षीयांते देखा, नाही ते पेरिती,
कापिती, ठेविती कोठारांत ... ३
तरी देव पिता तयांते पोशितो
भोजनहिं देतो नित्य नवे ... ४
काळजी करुनि काय व्हावयाचें
नची मिळायाचें काहीं तुम्हा ... ५
कोण रे शकेल वृद्धी करायाला
देहाची आपुल्या गहुंभर ... ६
ईश्वर सर्वज्ञ जाणे सर्व कांही,
विसर बा नाहीं तुमचा त्या ... ७
-------- ग. र. नवलकर
______________________________________________________________________________
३७३. ख्रिस्तभक्तीचीं लक्षणें
धन्य नर खरे जगिं
जे प्रभूस सेविती,
रमिती भक्तिमाजीं, जे
जीवितसार जोडिती ... ध्रु
सत्यज्ञान भक्त ते
भावबळें शोधिती,
त्यापुढतीं ऐहिक हे
क्षूद्रसेच लेखिती ... १
ख्रिस्तदास नाम ज्या
वागवाया महती
गमतसें, प्रभुपदीं
प्रेमपूर्ण अर्पिती ... २
सुखनिधान येशूला
स्वाचरणी दाविती,
गिरिशिरिस्थित पुरसम ते
या जगास शोभती ... ३
येशू तारका संख्यासि
जगत येई शरण, ती
घडी पहावयास सतत
अतुर बहुत राहती ... ४
भक्तवत्सला प्रभू,
स्वजन तुजसि विनविती,
त्वत्समागमीं सदा
राखीं, म्हणुनी मागती ... ५
------ वि. का. कोशे