३७४. देवप्राप्तीचा मार्ग

मराठी

३७४. देवप्राप्तीचा मार्ग देव पाहिजे तुला तरी तूं तयास सोडून फिरू नको, फार कशाला निजदेहाचे चिंतन इतके करू नको ... ध्रु पोटासाठीं याचा सेवा वचन असले पाप नको देवावाचून अन्य तुला रे माय नको कीं बाप नको तुला सांगतो सर्व गुणांचें साधन तें तूं विसरू नको, जगो देह हा आज मरो वा स्वत्व कुणाला विकू नको द्रव्याचा हव्यास नको, कदा नराची आस नको, विषयसुखाचा त्रास नको, प्रेम असो ताव मनीं निरंतर, वैराग्याचे नांव नको ... १ जगांत राहून सदा नराची सेवा कर, तू हटू नको परंतु अपुली सेवा व्हावी परतून म्हणुनी झटू नको निंदास्तुतीचा जगिं तमाशा फंदी तूं त्या पडू नको कोणी काही म्हणो तुज तू तर हसूं नको वा रडू नको जगिं कुणावर रुसूं नको, निष्क्रिय होऊन बसू नको, कीर्तिकर्दमी फसू नको, ह्या हातानें करशील तू तें त्या हाताला कळवू नको ... २ देवांवाचून अन्य कुणाचे जगांत भय तू धरू नको परंतु आपण धूळ चिमूटभर मूळ आपुले विसरू नको अशनी, पानी, शयनी, ध्यानी शास्त्र दूर तू करू नको मी पापी उद्धरिला ख्रिस्ते कदापि हे विस्मरूं नको शहाणा म्हणुनी गाजू नको, वेद म्हणतां लाजूं नको उणा कोणाला मोजू नको, घे घे घे इहपरत्र अपुला ख्रिस्त करून, तूं राहूं नको ... ३ -------- ना. वा. टिळक ______________________________________________________________________________ ३७५. लोकमित्र खरोखर लोकमित्र ते सेवक आपण सार्वजनाचे, स्वप्नी ठाऊक अन्य न अपुले ज्यांस जगिं नाते ... ध्रु उदार हृदये, गभीर वृत्ती, जी जीवीं ती सत्यि प्रीती, रविमंडळहि भेदूनि भूती संतत शोभे ते ... १ रुची न ज्यांची भिकार वित्ती, बुदबुद केवळ ज्यांना कीर्ती, कार्य न ज्यांच्या क्षणहि चित्त्ती लोकहितापरतें ... २ लोकहिती पित्याची चिंता, संवर्धनी मातेची ममता, धरिती जंपरिचर्या करितां सृष्टिसम समते ... ३ जनसेवा हि ईश्वरसेवा, यावीण दुसरा धर्म न ठावा प्रेम आणखी देव दिसावा एक सदा ज्यांते ... ४ धन्य धन्य ह्या धन्य विभूती प्राप्ती ह्यांची स्वर्गप्राप्ती देवा, ह्यांची भारतजगती नित्य वाट बघते ... ५ -------- ना. वा. टिळक