मराठी
३७६. सहकारित्व
सहकारी हो सहकारी
विश्व सकल हें सहकारी ... ध्रु
बांधाया, मापायाला
शकत न केव्हां कुणी ज्याला,
चला विचारूं त्या काला,
ऐकू त्याच्या वचनाला,
मम अंगांतें मांडीत करिते,
सांभाळिते
त्या सहकारित्वि सारी
माझी सदाची भिस्त खरी ... १
आप, तेज, धरणी, अनिल,
व्योम, महाभूतें सकल,
सहकारी, यास्तव वसतें
नातरी विश्वच हें नसतें
ह्या ग्रहगोला सवाल केला.
तर अपणाला
म्हणतील हे, आमुची सारी
सहकारित्वि भिस्त खरी ... २
या, खालीं या, वनीं चला,
पुसुनि घ्या या अचलाला
चला विचारा झर्याप्रती,
घ्या ऐकून हे जें म्हणती,
पर्वत, प्राणी, वृक्षश्रेणी,
अवघे प्राणी
म्हणतील हे आमुचे सारी
सहकारित्वि भिस्त खरी ... ३
एक काय म्हणे रान
किंवां नर्वसतीस्थान
फार कशाला पिपीलिका
काय म्हणे ते या ऎका
जेथें तेथें जें ते करिते
सदा ध्वनीते
कीं आहे अमुची सारी
सहकारित्वि भिस्त खरी ... ४
दूर कशाला ह्या देहीं
सहकारित्वावीन कांही
न दिसे अंत:सृष्टी हि
सहकारित्वावीन नाहीं
लोकीं म्हणती जिला संसृती
ती तर नुसती
सहकारित्वाच्या मुक्ती खरी ... ५
सह्कारीत्वें परमेश
आश्रय भक्ताची आस
सह्कारीत्वें भजन घडें
चरणी त्याच्या चित्त जडे
देव सांगतो निसर्ग म्हणतो
मीही गातो
अन्योन्यांचे सहकारी
होऊं नरनारी सारीं ... ६
-------- ना. वा. टिळक