मराठी
३८६. प्रभूसहवासाचे सुख
प्रभू माझा मला जेहाँ
बसे घेऊन एकांतीं
किती वर्णू मला
तेव्हां घडे जी हो सुखप्राप्ती ... ध्रु
प्रभूसंगें मला पाही
दुरात्मा तें पळे दूरी,
गळे सामर्थ्य मोहांचे,
नुरे कोणी कुठे वैरी ... १
मला बोधामृता पाजी,
रादा देई नवी तृप्ती,
कुठे चिंता ? कुठे दुःखें?
क्षणें सारी लया जाती ... २
प्रभूची ती खरी प्रीती
बघे माझ्या प्रमादांला,
शुभा चिंतूनियां माझ्या
करी माझ्या निषेधाला ... ३
प्रभूची ती जरी दुःखें
उणी झाली दिसे कांती
तरी शल्येच ती माझ्या
मला वाटे उरीं जातीं ... ४
प्रभू माझा वदे
वाणी किती ती गोड मायेची
तई नेत्रांतुनी माझ्या
वहाते धार अश्रूंची ... ५
जणू पायीं तयाच्या
हीं फुलें वाही मनोवृत्ती
प्रभू सप्रेम आलिंगी मला,
नेत्रे पुशी हातीं ... ६
प्रभूसंगे मिळे जीवा
नसे कोठे तशी शांती,
प्रभू माझा स्वयें नीती,
प्रभू माझा स्वयें प्रीती ... ७
प्रभूवांचून नाहींशी
मला होती जणं नातीं,
प्रभू माझा भरे नेत्री
प्रभू माझा भरे चित्तीं ... ८
दुरीं जाता लिही माझ्या
मनीं प्रेमें निजालेख्या
न हो सीमा न हो सीमा
प्रभूच्या ह्या जगीं सख्या ... ९
सुखें सारी, यशें सारी,
सुविद्या, सर्व संपत्ती ,
मला सारें प्रभू वाटो,
सदा राहो अशी वृत्ती ... १०
------ ना. वा. टिळक