मराठी
३९१. दुःखासाठी प्रार्थना
पाळि सुखाची पुरे,
येउं दे दुःखाची आता,देवा
एक कराचा नको,
आसरा दोन्हि करांचा मज व्हावा ... ध्रु
स्तंभ दुःखमय प्रभु येशूचा
उभा सदा विजयस्तंभ
दु:ख तरी तें कसें जेथूनी
स्वर्गसुखाचा आरंभ
नवल वाटतें हाच नको ह्या
जगामधे रंका रावा,
हाच टाळावा म्हणून रडती
करिती वेडपे तव धावा ... १
अबल, अमंगल करुन ठेविला
आम्हीं अपुला कर डावा,
म्हणून तुलाही , परमपवित्रा,
न्याय हाच का लावावा
हाच पाहिजे, तो स्तन नलगे,
हट्ट असा जरिं धरि छावा
तरी, माउली, तुला ठाउके
किती वेळ तो पुरवावा ... २
इयोब झाला इयोब, झाला
पौल पैौल ज्याच्या योगे
प्रभुरायानें आलिंगीलें
दृढ हृदयीं जें अनुरागे
त्या सैौभाग्या, देवा,
जग हें दुःख अशा भलत्या नांवा
दे मजला दे तेंच, दयाळा
घे जाणुन तूं मम भावा ... ३
तुवां निवडिलें, तुज आवडलें,
स्वकीय गणिलें, जयांवर
पुरा तुझा विश्वास,
असे जे तव राज्यींचे सरदार
आड मार्ग मज हाच कशाला
मार्ग तयांचा मज ठावा,
मी केले प्रस्थान ईश्वरा,
तूं सांभाळीं मम जीवा ... ४
-------------- ना. वा. टिळक