मराठी
३९५. आपली विस्मृति होऊ नये म्हणून विनंती
प्रभू दीनबंधू नाय पातकी जनां
नच कोणी या जगीं
दिसे तुझेविना ...ध्रु
तूं सखा, तुझ्यावरीच भाव ठेविला,
चालवीं धरूनि हाती या सुदुर्बला,
देई वस्ती पायिं नित्य, बा सुमंगला,
माझी राहुं दे स्मृती,
स्वदासवत्सला ... १
आठवीं कृपावचां स्वकीय निर्मला,
माझिये जीवास जीव नाहिं का दिला
दुःखभार पाप वारण्यास सोशिला
माझी राहुं दे स्मृती
स्वदासवत्सला ... २
स्वर्गीच्या समर्थ वाली माझिये, तुला
तुं शरण्य जाणुनी सुभाव अर्पिला,
बा सख्या, स्वराज्यवैभवासनीं तुला,
माझि राहुं दे स्मृती,
स्वभक्तवत्सला ... ३
दोषी पापि, दुष्टसा तरी तशा भला मुक्तिदानलाभ देसी ज्या नसे तुला,
सर्व-यापि त्वद्दया स्मरोनियां तिला
माझि राहुं दे स्मृती,
स्वभक्तवत्सला ... ४
मृत्यु मालवील पंचप्राणज्योतिला,
आप्तइष्टमित्र साह्य सोडि जै मला,
तारका सख्या, तई, करी विनंतिला,
माझि राहुं दे स्मृती,
स्वभक्तवत्सला ... ५
-------------------- वि. का. कोशे