मराठी
३९८. हृदयमंदिरी येऊन राहण्यास प्रभूस विनंती
ममहृदयी जन्म घेई,
ये सदया येथे राही, ये, प्रभू
हे मंदिर शुद्ध नसे रे,
तूं कर परी निर्मल सारे,ये प्रभू ... ध्रु
तूं सर्व सदोदित जिथें, तमाची तिथें
क्षनस्थिती नाही, मुळी गती नाही
ये ख्रिस्ता धावुनी येई, ये प्रभू ... १
मी माझे लोपून जावो,
जग तुझेच अवघे होवो, ये प्रभू,
मज म्हणो कुणी दुर्भागी,
बावळा जोगी,
मला क्षिती नाहीं, मला भय नाही
तू माझा होऊन राही, ये प्रभू ... २
मी मंदिर तूं मम देव,
मी कुडी, प्रभो, तूं जीव, ये गडे
पाहिजे तुला ते करी, तुझ्या मी करी
तुझ्या मी पायी प्रभो, तव पायी
सर्वस्व वाहतो, येई, ये प्रभो ... ३
----- ना. वा. टिळक