मराठी
३९९. येशूशीं संयोग
प्रिय येशू, येई, येई
ये माझ्या हृदयी राहीं, तारका ... ध्रु
जें तुला मला दूर नेई
त्यापासून मजला त्राही, तारका
जो विचार तुझिये ठायी
तो माझा जेणें होई, तारका,
तव शब्द तेच मम व्हावे, मला हे द्यावे
लागतो पायी, लागतो पायी
मम सारे मीपण घेई, तारका ... १
ती प्रीती तुझी ती क्षांति,
आनंदयुक्त तव वृत्ती, तारका,
तव होता हृदयी वस्ती
हि सारी तुजसह येति, तारका
वाहील सुखाचा झरा, स्वच्छ, साजरा,
जयाला नाहीं, जयाला नाहीं
क्षय, वृद्धीस संतत जाई, तारका ... २
मज नेई बरोबर मरणीं, ख्रिस्ता,
तव पुनरूत्थानी तारका,
हो स्वर्ग मला मग धरणी,
हो एकच मज दिन रजनी, तारका
मी जगे मोह हा जावा, असें कर देवा
तूंच मम ठायिं तूंच मम ठायिं
वा जगता होई होई, तारका ... ३
मज मध्ये तुजला पाहो
जग सारे तुजला गावो, तारका
देवाचे राज्यची येवो,
यास्तव हे प्रिय मम होवो, तारका
तूं सूर्य अलौकिक ख्रिस्ता
कधी नच असता
तेज तव जाई तेज तव जाई
तव ठायिं शांती राही, तारका ... ४
--- ना. वा. टिळक