आईसाठीं प्रार्थना

मराठी

४४० आईसाठीं प्रार्थना हृदय आईचे कसें असे हें तुला ठाउकें प्रभुराया, चिंता तिच्या, प्रेम तिथेचें नलगे तुजला सांगाया मायवार हा आज उदेला सूर्यच मातृपदावरती, ऐक माझिया प्रिय आईस्तव लहानशी माझी विनंती ... १ रक्षीं, रक्षीं जीवन माझ्या नजीवदात्रीचे सदया, स्वयें तूंच हो जीवन तिचें, सर्वसुखोत्तमसुखाश्रया एकवार मी हृदयी जिच्या झोप घेतली निर्धास्त, तिचा आसरा तूंच हो, तिचें पावो चिंताभय अस्त ... २ मीं मागावें, तिने म्हणावे कधी कधी नाहीं मजला, त्या नाहितंच मौज केवढी कसें सांगवें शब्दाला अभिष्ट तिचें पूर्ण करीं, परीं नाहीं म्हणणे जरी झाले, तरी तयाने उभे राहू दे प्रेम तिजपुढे ताव सगळें ... ३ मला आठवें धरून माझा हात तिने मज चालविले, वागविले मज, पडतां पडतां वरचेवर झेलून धरिलें प्रभू , तुंही धर हात माझिया प्रिय आईचा निरंतर कसा असो पथ तिच्यापुढें तो सुखद, सुगम तूं तिला कर ... ४ तुला ठाउकें अगा प्रेमला, कर्ज तिचें किती मजवर तें, कर्जदार मी तिचा सदाचा असाच राहीन मज कळतें तिच्या कृतीचे फळ दे तिजला इहलोकी वा परलोकी तूंच उदारा तुला प्रार्थना मम दीनाची हि इतुकी ... ५ ----- ना. वा. टिळक