मराठी
४५३. मंगलचरण
परमपवित्रा, कृपाछत्र तव,
बापा, दीनांवर व्हावें,
परमपवित्रा पुत्रा,
प्रेमे अबलांना संभाळावें ... ध्रु
परमपवित्रा आत्म्या,
आम्हां मूढांना तूं प्रेरावें
हे त्रिविधैका, दान असें दे
कीं आम्ही तुज सेवावें ... १
पवित्र तव ते नाम जगिं ह्या
पवित्र सकलीं ठेवावें
मनांत अमुच्या, जनांत अमुच्या
राज्य तुझे ते चालावें ... २
तव इच्छेला ह्या जगतानें
सदैव हर्षें वंदावें
तव भक्तांनी इथेंच,
सदया स्वर्गसुखाला पावावें ... ३
----- ना. वा. टिळक