मराठी
४६१ प्रभुभोजनसमयी सुचलेले विचार
कशाला अतां मोह पापें कशाला
कशाला, अतां क्लेशचिंता कशाला
पुढें माझिया मार्ग मी अन्य पाहें,
शरीरीं तुझें रक्त खेळुनि राहे ... १
जगा येऊं दे घेऊनि वागुरांना,
बघू दे जगाच्या प्रमत्ता गुरांना,
मला जिंकणे साध्य कोणास नोहे
शरीरीं तुझें रक्त खेळुनि राहे ... २
करो कोणी निंदा, धरो मत्सरातें,
न माझे उशाशी कशाचेंच नातें,
तुझयावाचुनी शून्य सारें मला हे,
शरीरीं तुझें रक्त खेळुनि राहे ... ३
वधस्तंभ मीं घेतला स्कंधदेशी,
खिलोनी तया घेतलें आपणाशीं
पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे,
शरीरीं तुझें रक्त खेळुनि राहे ... ४
जिथें मी तिथें तूं सदा व्यापलेला,
अशा प्राशीला मीं, प्रभो, आज प्याला
मनीं स्वर्ग, माझ्यापुढें स्वर्गता हे,
शरीरीं तुझें रक्त खेळुनि राहे ... ५
----- ना. वा. टिळक