मराठी
४८३. निशीथकाल
गेला रवी अस्ताप्रती,
निशीथकाल शोभला,
घातियला व्याधीग्रस्ती
वेढा दयाकरा, तुला ... १
नानापरीं दुःखें तयां
परी समस्त लोपती
त्यांच्या सुखा वर्णावया
शब्दी नसोची शक्ती तीं ... २
मनास आधी वेधितीं
तनूस व्याधी विंधिती
नसे, प्रभो, जगिं गतीं
तुज्याविना आम्हांप्रतीं ... ३
ख्रिस्ता, तुझ्या रूपाप्रती
पहावया न साधनें
तूं राहशी ऐशी मती
अम्हां नुरे तरी उणें ... ४
कोणी झीजे रोगामुळें,
रडे दुजा निराश तो,
कोणी जळे चिंतनळे
साऱ्या जगा कुणी भितो ... ५
कोणी म्हणे कैसे करूं
कसें मनास आवरुं
कैसा भवांभोधि तरु
किवां असें तसा मरुं ... ६
कुणी तुला त्यजियलें,
कुणीं पुरें न मानिलें
शांती नसे, नसे भलें
जे तें दिसें विडावलें ... ७
मैत्री जगिं स्वप्नातलीं
असे जरी विलोकिलें,
मैत्री तुझी न साधिली
वेडयांनीं रे भयामुळें ... ८
थारा नसे विश्रांतीला,
अपाप नाहीं रे कुणी
सेवा तुझी हवी मला,
बोले परी भितो मनीं ... ९
ख्रिस्ता, प्रभो, उद्धारका,
नरा खराच तूं सखा
दुःखा, भया, मोहादिकां
पाहियलें तुवां न का ... १०
ख्रिस्ता, तुझी प्रेमाद्र ती
जगीं समस्त पाहती
दृष्टी, बघे व्रणांप्रती
हि लाज ज्यास झांकिती ... ११
स्पर्शी प्रभो, शक्ती जशी
अजून तीच ठेविशी,
वायां न काहीं बोलशी,
भूती तुझी सदा अशी ... १२
आम्हां प्रभो, आरोग्य दे
निशिथकालीं आज या
आम्हां दयासिंधो, वदे,
माझी असे सदा दया ... १३
----- ना. वा. टिळक