मराठी
४९२. मार्येप्रमाणे प्रभुचरणाची लालसा
जशी बसली तव पदाजवळ मार्या
दूर सारून विसरून अन्य कार्या,
तसा माझा होईल का निवास
तुझ्या पायिं, तारका, अनायास ... १
कधीं पाहीन त्या तुझ्या स्वरूपाला
कधीं प्राशन तव वाणीच्या रसाला
कधीं सारें जग नाहीसें दिसेल
स्वर्ग उतरून मजपुढें तो बसेल ... २
तुझ्या सहवासी एक विपळ गेले
मोल त्याचें मज वाटतें निराळें,
कमी पृथ्वीचे राज्य तयाहोनी,
तुझ्यासंगे सम लोक मला दोन्ही ... ३
प्रेम अनुतापें तापल्या जीवाचें
तुला ठावें, मी काय वंदू वाचे
तुझ्यासंगे जाईल तेवढेंच
मला वाटे कीं जिणें जिणें साच ... ४
तुझा झालो, स्वीकार तुवां केला,
प्रभो, माझा, तरी जीव हा भुकेला
तुझ्यासंगे राहण्या इथें तेथें
नको आता पाठवूं दूर मातें ... ५
---- ना. वा. टिळक