मराठी
४९४. यापुढे प्रभू माझें सर्वस्व
यापुढे, प्रभू , तूं माझा
प्रिय बंधू , स्वामी राजा, यापुढे ... ध्रु
तव सेवा हि मम अन्न,
तव चिंतन हे मम शयन यापुढें
तव नामाचा जयघोष
हा माझा श्वासोच्छवास यापुढें
हि दृष्टी जगाला विटली,
तुझ्या पदी जडली,
प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू , स्वामी राजा, यापुढे ...१
तुजसाठीं गृहसुतदारा,
तुजसाठी सर्व पसारा यापुढें
तुजसाठी वस्ती देहीं
तुजसाठी दिशा ह्या दाही यापुढें
हे स्वत्व अर्पिलें घेई एवढे देई
प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू , स्वामी राजा, यापुढे ...२
मम विचार तूं मम उक्ती
तूं युक्ती, भुक्ती, मुक्ती, यापुढें
मी तूं हा भेदच नूरला
उरला तरी तो दिसण्याला यापुढें
मी मुक्त, सुखी मी शांत, सदा स्वर्गात
प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू , स्वामी राजा, यापुढे ...३
---- ना. वा. टिळक