मराठी
४९८. आपला वधस्तंभ उचलणे
भार तुझा तुजला सहवेना,
तुज सबलाचें साह्य हवें ना
जा तर वेगे प्रभूच्या मागें,
उच्चल आपला खांब ... १
चल ये पाहुं प्रभूच्या मागें,
बोलावीं तो किती अनुरागें
पुष्कळ झालें तूं जे केले
उचल आपला खांब ... २
अक्षय जीवन अक्षय जीवन
करीत बस हे अरण्यरोदन
तेंच हवें तर चल चल सत्वर
उचल आपला खांब ... ३
समदुःखाची, हिताहिताची
समजूत तव रे लघु पोराची
ऐक गुरुचें प्रभुरायाचें
उचल आपला खांब ... ४
प्रभूच्या मागें जाणे म्हणजे
खांब उचलणे ऐसे समजे,
यावीण त्याचा शिष्य कशाचा
उचल आपला खांब ... ५
शूर वीर तूं , प्रभू सेनापती,
समरांगण हे जग तुजपुढतीं
सोड, सोड भय, नित्य तुझा जय
उचल आपला खांब ... ६
प्रभुमय आत्मा, प्रभुमय वाचा,
भूवरतीही स्वर्ग तयाचा,
बोल, प्रभो जय ख्रिस्ता जयजय
उचल आपला खांब ... ७
---- ना. वा. टिळक