मराठी
५०४. भक्तास लागलेला प्रभूचा छंद
मीं त्यजिलें अवघे धंदे,
प्रभु येशू , तुझिया छंदे, यापुढें ... ध्रु
मज नको दुजे जगिं कांही,
तूं मात्र मनीं मम राहीं, यापुढें
तूं अन्न, तूंच रे पाणी, सुखाची खाणी,
जीव आकरंदे, जीव आकरंदे,
तुजसाठी, हे प्रेमाबधे, यापुढें ... १
तूं नेशील तिकडे येतो,
करविशील तें तें करितों यांपुढें
क्षण मला नको रे सोडू ,
नको दूर धाडू,
जवळ राहूं दे, जवळ राहूं दे
हि इतकी भिक्षा दे दे, यापुढें ... २
अति दुर्बळ, दुर्मति नीच
तव शिष्यांमध्ये मीच यापुढें,
परी अगा पतितपावना अशा दुर्जना
प्रेम तव लाधे, प्रेम तव लाधे,
शरणागत मी आनंदे, यापुढें ... ३
घे मन्मन, घे मम काया,
घे, लाव आपुल्या कार्या यापुढें
उभयतां वस्तुसावली वागुं ह्या स्थलीं,
दान दे साधें, दान दे साधें,
मी घालो आशीर्वादें, यापुढें ... ४
---- ना. वा. टिळक