मराठी
५०५. सेवारतता
जनसेवारत ईश्वर नसता
तरी धावा ऐकता
नताचा का ऐसा धावता ... ध्रु
सेवारतीने मातृपदाला
दिली जगिं उच्चता
जहाला जो तो त्या वंदिता,
रत सेवाधर्मी वस्तुजात तेवढें
सुखसेवा सकलां नाच कोणा सांकडे,
ती द्वेष्य तया जे देवाशी वांकडें,
सकल सृष्टीचें वैरी स्वैरी सेवेची द्वेष्यता
जयां प्रिय केवळ जीवनमृता ... १
सेवा घ्यावी म्हणून नाही, सेवा करण्यास्तव
जगिं मम नारवंशीं उद्भव
हे ख्रिस्तवचन, हें ख्रिस्तशील परखां,
मग म्हणा सद्गुरू तोच जगाचा सखा,
टेन प्रेम न सेवा ज्यास दुःखदायका
सेवाप्रिति वृक्षमुलसम सदैव हो संयुता,
प्रीती हि केवळ सेवा स्वतां ... २
---- ना. वा. टिळक
____________________________________________________________________________________________________________________
५०६. आत्मसमर्पण
तन मन धन, प्रभू, तव चरणीं,
सकल तुझे हें तूंचि दिलेसीं,
अघटित तव करणी ... ध्रु
माझें हें, तें मींच मिळविलें,
समजतसें अभिमानें पूर्वीं,
आतां खेद मनीं ... १
मी, मम जाया, कन्या, सूत हे
दास तुझ्या चरणांचे सारे,
प्रियकर तूंचि धनी ... २
बेत, विचारही, हार मम करणें
अवलंबें इच्छेवर तव बा,
करितों मनधरणी ... ३
वाट, खरेंपण, जीवन मम तूं ,
शरणागत मी पतित तुला गा
जय दे भवतरणीं ... ४
-------कृ. र. सांगळे