मराठी
५१० . आत्मसमर्पण
प्रिय प्रभू , माझा प्राण
तुला अर्पितो हे दान .. १
रात्रंदिन मनोभावें
तुझें प्रेम मीं स्तवावें ... २
मना उकळी फुटावी
हातां प्रेरणा मिळावी ... ३
पायां जासूद करावें,
तुझ्या मार्गीं त्वरे न्यावें ... ४
तुझा अमूल्य प्रसाद
वाणी गावो स्तुतिवाद .... ५
सोनें , रूपें हें तूं घ्यावें,
मीं न काहींचं ठेवावें ... ६
--- हेफसीबा पी. ब्रूस
________________________________________________________________________________________________________________________________________
५११ . ख्रिस्तार्पण
ख्रिस्तार्पणमस्तु, अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ..ध्रु
मनांत येई विचार तो तो
ख्रिस्तार्पणमस्तु
उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु
आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु
मीपण माझें ख्रिस्तार्पणमस्तु... १
भार्या, कन्या, पुत्र बांधुगण ख्रिस्तार्पणमस्तु
मोठेपण वा लहानपण हें ख्रिस्तार्पणमस्तु
निर्धनता कीं धनाढ्यताहि ख्रिस्तार्पणमस्तु
प्रपंच अवघा ख्रिस्तार्पणमस्तु ... २
प्राणप्रियतर जन्मभूमी ही ख्रिस्तार्पणमस्तु
दैन्य हिचें वा वैभव हिचें ख्रिस्तार्पणमस्तु
आशा माझी हिच्याविषयीची ख्रिस्तार्पणमस्तु
मम अश्रू हे ख्रिस्तार्पणमस्तु ... ३
निंदास्तुतींचे गारुड सगळें ख्रिस्तार्पणमस्तु
मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु
जगणे मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु
जग हें सारें ख्रिस्तार्पणमस्तु ... ४
---- ना. वा. टिळक