५१४. ख्रिस्तसैनिकांस आव्हान

मराठी

५१४. ख्रिस्तसैनिकांस आव्हान चला सिद्ध व्हा, या समरा जयघोष करा, जयघोष करा, करा त्वरा रे, करा त्वरा जयघोष करा, जयघोष करा ... ध्रु ढाल करी घ्या विश्वासाची, कट्यार घ्या रे प्रभूवचनाची, खरेपणें बांधा कमरा, जयघोष करा, जयघोष करा ... १ उरस्त्राण नीतीचें घाला, चढवा तारण ह्या टोपाला, प्रभुप्रीतीचा ध्वज उभरा, जयघोष करा, जयघोष करा ... २ मोहपाप, दुःखादीक शस्त्रां मोडा तोडा या मरणास्त्रा, पराभूत सैतान करा, जयघोष करा, जयघोष करा ... ३ ख्रिस्तपदांवर आणून घाला दुरावलेल्या नरनारीला वसुंधरासंताप हरा, जयघोष करा, जयघोष करा ... ४ प्रसंग पडला जाणून बांका, दिवस असे तों झुंजा, जिंका प्रभू आपुला तरी विजय खरा, जयघोष करा, जयघोष करा ... ५ हृदयी, इकडे, तिकडे, पुढतीं, मागें, खाली, किवां वरती, ख्रिस्त उभा, हा भाव धरा, जयघोष करा, जयघोष करा ... ६ ---- ना. वा. टिळक