मराठी
५१९. हिंदुस्थानांतील ख्रिस्ती
धर्मभूमी हा देश आपुला,
गड्या येथला तूं ख्रिस्ती,
सावध, सावध, व्यर्थ ना होवो
ह्या लोकांची ताव वस्ती ... ध्रु
सर्व पसारा हा देवाचा,
उच्चनिचभावी वृत्ती
नसो तुझी, तूं जिकडे तिकडे पहा
जगिं भरली प्रीती
वैर तुझें जग करो,
न हो तूं कधी कुणाचा आराती,
आशीर्वचने जीभ वदो तव
जरी धोंडे माथां पडती
सदा बरे कर सर्वांचे,
चिंत न वाइट कवणाचें,
ओळख मन परमेशाचें
सूर्य तयाचा सदा प्रकाशे
भल्यावाईटाच्यावरती ... १
पंगू दीन जे जनें टाकिलें
दुःखावेशें ओरडती,
निजपुत्रासम घे, घे त्यांना
आधीं तूं अंकावरती
जे देवाचें राज्य शोधिती
तेच सोयरे गण चित्ती,
माझी नच हि, परी ख्रिस्ताच्या
वचनाची पुनरावृत्ती
नको उद्याची चिंता रे,
पाहून घेईल प्रभू सारें,
बळकट धार विश्वासा रे,
ह्या लोकींचे जगणें मरणें
एकच ऐशी ठेव मती ... २
परमेशाचें न्यायासन तूं
रात्रंदिन बघ रे पुढतीं
असो दृष्टी तव सदैव
जडली ख्रिस्ताच्या खांबावरतीं
मी पापी, मी भणंग दुबळा,
मान सदा अपणा जगतीं,
वाग असा कि पाहून तुजला
ख्रिस्ताला जन गौरवितो
हाचि जागी उपदेश खरा,
झीजवाया मग नको गिरा,
चाल धरून प्रभुच्याच करा,
दर्शन, गर्जन पुरें न,
भूमी मेघ कोसळे तंव भिजती ... ३
------ ना. वा. टिळक