मराठी
५२२. जनसेवा करितांना ख्रिस्तानुकरण
जगाला मेलेले, जगासाठी मेले,
जगासाठी झाले चिरंजीव ... १
जगाने निंदिलें, जगाने वंदिलें,
जगासाठी झाले दिन दुःखी ... २
ख्रिस्तमय मन, ख्रिस्तमय वाचा
देहही ख्रिस्ताचा सदा झाला ... ३
अधिव्याधी, मृत्यू पळोनियां जाय,
आम्हाला अपाय नाहीं कोठें ... ४
संपत्ती आमुची, अगाध अमोघ,
सदा तिचा ओघ वाहताहे ... ५
वधस्तंभ वाहे नित्य खांद्यावर,
राज्य जगावर करुं आम्ही ... ६
दास म्हणे, आम्ही ख्रिस्तशिष्य ऐसें
जसा गुरू तैसें वागणारे ... ७
-------------- ना. वा. टिळक