मराठी
५२९. देवनियुक्त मार्ग
प्रभो, तुझीच साउली
असेन मी जगिं भलीं
रहस्य आपुलें मला
निवेद तूं सुमंगला ... १
सहीन मी श्रमाप्रतीं
छळोत चिंतनें किती,
प्रभो, गुरो असें करी
मला सदा करें धरीं ... २
प्रभो, मनास जिंकितां
सहानुभूती दाविता
असा सुशब्द तूं मला
शिकिव, भक्तवत्सला ... ३
कुमार्गवरती पाउलां
शिकिव आवरुं मला,
गृहाकडे तयां गती
शिकिव केवीं देऊं ती ... ४
तुझी प्रभो, सहिष्णुता
शिकिव सर्व संमता,
सुखावहा सदैव ती
तुझी घडो सुसंगतीं ... ५
अभंग एकनिष्ठता
धरी नवीन चारुता
ज्यामुळें, घडो मला
असेंच काम वत्सला ... ६
पुढें प्रवेश दूर तो
जिचा प्रकाश दावितो,
सहायता अमोघ ती,
प्रभो तुझ्याच संगती ... ७
न अन्य कोणीही, परी
सुशांती देशी तूं खरी
सदैव ठेव, निर्मला,
तुझ्याच पाउलीं मला ... ८
----- ना. वा. टिळक