५८१. विवाहसमयिंची प्रार्थना

मराठी

५८१. विवाहसमयिंची प्रार्थना ह्या वधूवरांना आशीवरचना द्यावें, हे दयानिधे, तूं ह्यांना सांभाळावें ... ध्रु तूं विवाहविधी हा प्रेमे संस्थापीला, हे परमपवित्रा पवित्र तूं हा केला ह्या वधूवरांनी दिव्य हेतू जो ह्याचा तुज दावावा तो करून, दयाळा, साचा आज हि प्रेमरज्जुनी बांधिली, एक हीं मनें बा दोन्ही जाहली, तुजपुढें पती कीं पत्नी शोभली तुज गृहांत ह्यांनी मनीं प्रतिष्ठापावें, हें कृपादान तूं वधूवरां पुरवावें ... १ जशीं देहीं बुद्धी गृहीं तशी हि गृहिणी, गृहराज्यावरची धन्य मान्य हि राणी, हा पती देहींचा प्राण तसा निजगेहीं सुखदायक होवूत परस्परां उभयें हि नववधूवरां राखाया यांजला, सांगण्या रोज शिकवाया यांजला, निर्मला ख्रिस्तप्रभुराया प्रेमला, तूं ह्यांचे गृह टेन अपुलें मानून घ्यावें, हें गृह ख्रिस्ताचें असेंच लोकीं व्हावें ... २ हा संसाराचा मार्ग सारखा नाहीं, हा कुठे सुखद, हा कुठें व्याप्त विघ्नाही निर्गर्व सुखीं ह्यां ठेव संकटीं शांत. सुखदुःखि ह्यांचा त्यजूं नको तूं हात फुलल्या प्रेमवृक्षाला ईश्वरा, मधू , फळें येउ दे याला, ईश्वरा, घेऊ दे स्वाद आम्हालां ईश्वरा, चिरकाल दंपती करोत तुझिये सेवे, जग म्हणो निवडिलें कुटुंब अपुले देवें ... ३ ------- ना. वा. टिळक