मराठी
५८८. मंदिरसमर्पण
तूं अमुचें सुखधाम दयाळा,
तूं अमुचें सुखधाम ... ध्रु
मंदिर हें तव समक्षतेनें
होवो नित्य ललाम
प्रणतजनाला लाधो येथें
सुख, शांती, विश्राम ... १
अखंड, मंगल, अभिनव, निर्मल
तुझें प्रेम निष्काम,
चिंतन त्याचें नित्य घडूं दे,
तेंच जगिं अभिराम ... २
घ्याऊ सेवूं वंदू तुजला,
गाऊं, तुझें मधू नाम,
तुझ्या मंदिरी तव सहवासीं
पावू दिव्याराम ... ३
---- ना. वा. टिळक