मराठी
५९०. पाळकांची प्रतिष्ठापना
शुभमंगल दिन हा, देवा तूं दाविला,
या संघा अपुल्या संघपाल तूं दिधला
हि तुझी मंडळी खरोखर रे आहे,
तव प्रेम हिच्यावर संतत, सदया, राहे
भक्ताला या निवडीला तूंच रे,
त्यावरी कार्य सोपिले तूंच रे
त्याजला सिध्दही केले तूंच रे,
तव आत्मा, बापा, दे दे या भक्ताला,
हि कठीण खरोखर सेवा साधो याला ... १
तव सैन्य असे हें, नायक हा सैन्याचा
तूं शीर्ष संप्रती राजा या दोघांचा
दे ज्ञान, प्रभो, तूं आतां याजला,
शिकविण्या गूढ तव, ताता याजला,
आम्हाला, सर्वसमर्था वत्सला,
करी करी कृपा तू याच्यावरतीं दयाला,
हे ज्ञानसिंधु, तूं शिकवाया आम्हाला ... २
हे जीवित अमुचे स्वराज्याचे ध्येय
दे आम्हां अमुच्या हिंदीस्ताना पेय,
तें पेय खरोखर तृप्ती आमुची,
ती स्वर्गसुखाची भुक्ति आमुची,
ऐकें तूं हीच विनंती आमुची,
तव सेवक, अमुचा पाळक हा तूं केला,
दे आयु:श्रीधी, सदया बापा त्याला ... ३
---- भा. कृ. उजगरे