मराठी
६०६. स्वदेशहितचिंतन
श्रीख्रिस्ताच्या प्रिय शिष्यांनो,
एक विनंती ऐका अमुची,
निजदेशाला सेवूं चला
करुनि चित्तें पूर्ण शुचि ... १
हिंदीस्तआना जीवाची माना,
बोधी असें प्रभू येशू सखा,
मित्र, गुरु, नच कुणी परका ... ध्रु
अवनत पाहून निजदेशाला
निज अश्रूंनी भिजवी तयाला
प्रभू आपला श्रमला, भ्रमला,
किती चित्तीं व्याकुळ झाला ... २
एकच ईश्वरबाप असावा,
एक जगद्धरू सकलां व्हावा,
एकाच पूजा, एक मती,
भारत वर्षी करू पूर्ती ... ३
विश्वकुटुंबी आपण सारे,
निजदेशी हा भेद कसा रे
बघवे अपणा या मोडूं
भिन्नपणा, सकलां जोडूं ... ४
भूमी अपुली ख्रिस्ती होतां,
ठेवील हिच्या चरणी माथा
जी ती भूमी पृथ्वीवरी,
येईल हिची कुणा न सरी ... ५
तन, मन, धन द्या, द्या जीवाला
निजदेशाच्या उद्धाराला
प्रभु येशुचा शिष्यपणा
या पाहुं द्या सकल जना ... ६
----- ना. वा. टिळक