मराठी
६०७. निजदेशाला जगद्गुरुच्या भजनी लावणें
हिंदपुत्र हो, प्रिय कन्या हो,
धर्मभूमी हि हिंद,
करा कार्य जें करील निजभु
सर्व जगाला वंद्य ... १
ख्रिस्ती आपण त्या ख्रिस्तासह
निजदेशाला सेवूं ,
आधीं आणून जगद्गुरुच्या
भजनी याला लावूं ... २
निसर्गसुंदर भूमी अपुली,
बुद्धिमंतांची राणी,
एकवार हि होती जगतीं
सर्व गुणांची खाणी ... ३
हीच जगाला खरें ख्रिस्तीपण
खरें करून दावील
हीच जगाला स्वर्ग म्हणाया
दूतांना लावील ... ४
हींचेंच आधीं तारण साधूं,
होऊं या उतराई
अमेरिकेचें, जी अपणांला
ख्रिस्तसख्याला देई ... ५
पुढे पहा तो इहपरलोकीं
मुकुट सदा जो अपुला
जरी ख्रिस्त ह्या प्रिय
देशाचा स्वामी, जीवन झाला ... ६
द्या धन, द्या तन, द्या मन द्या,
द्या जीवन अपुले सारे,
चला पुढे व्हा, बंधुभगिनिंनो,
हें मधू गाणे गा रे ... ७
निश्चय अपुला जरी
करूं हें करूच आपण तरी
----- ना. वा. टिळक