मराठी
६१३. नवसंवत्सर
भक्तराज, या हो करूं जयजयकार,
नाव संवत्सर आला, आला ... १
गेला तो जाऊं द्या,नको त्याचा छंद
पुढील आनंद साधा आधीं ... २
काळ आज उद्या एकच देवाला,
तुम्हाला आम्हाला भिन्न भिन्न ... ३
हृदयिं ईश्वर, बाहेर ईश्वर,
नव संवत्सर सदा त्याला ... ४
जयाचें जीवन प्रभू येशू झाला
हिशोब तयाला काळाचा न ... ५
ख्रिस्तशिष्य आम्ही सदा राहणारे,
सदाचे गाणारे जयगीत ... ६
दास म्हणे, प्रभू ओळखी आम्हाला,
आम्हीही प्रभूला ओळखींतों ... ७
---- ना. वा. टिळक