मराठी
६२०. गतवर्षाचा हिशोब
आयुमार्गातुनी चालतां वर्ष पुरें होऊं गेलें,
पुन्हा मिळेना ह्यास्तव
सांगा काय तुम्ही त्याचें केलें ... ध्रु
तीन शतें पासष्ट दिनातून किती दिन धर्माने नेले
परोपकारा, स्मरा गड्यानो, किती घटिकांना वाहिले,
किती पळे अथवा किती विपळे प्रभूसहवासी मन रमले
किती महिने स्त्रीधनसुतगेहादिक चिंतेने चोरिलें
पोटासाठी यात्रा सेवा वंचन करितां किती सरले
आयुमार्गातुनी चालता वर्ष पुरें होऊं गेलें ... १
निंदाकलहीं, दुर्व्यसनी वय खडतर शस्त्री किती तुटलें
अहा मित्रहो, जवळ मृतीला सांगा किती काळे केले
द्रव्य हरवितां मिळे परी तदगणनेला यत्ने लिहिलें,
विचारिलें का मनी कधीं किती गेली न मिळणारी विपलें
असो पुढें तरी सावध व्हा हें वर्ष दुजें प्रभूने दिधलें
आयुमार्गातुनी चालतां वर्ष पुरे होउन गेलें ... २
परमेशाने दिले कृपेने नरतनु हे आपणा किल्ले
आधिव्याधी, विषयवासना, मृत्युसवें यांवर हल्ले
सदैव करिती, यांशीं झुंजता जे दिन म्हणू येतील अपुले
त्यांत करा सार्थक्य गाडयांनो, जोंवर डोळे नच मिटले
गेलें ते नच परतुनी आले, ईशपदी परी किती रमले
आयुमार्गातुनी चालतां वर्ष पुरे होउन गेलें ... ३
गताब्द तें निर्विघ्न संपले, प्रभूने दुसरें दाखविलें,
हेंच भाग्य मानूं जरी नरवय गतवर्षाला आंचवलें
आंचवले जे नर तनुला ते प्रपंचकारातून सुटले,
नको त्यांचा शोक पित्याने बाळक गृहीं वाहून नेले
पापात्म्याला जिंकून वीजयश्रीच्या मुकुटीं ते नटले
आयुमार्गातुनी चालतां वर्ष पुरे होउन गेलें ... ४
गहनमार्ग हा खरा परंतु घ्याया आपणांला स्कंधीं
सदा सिद्ध प्रभू वत्सल, आपण मुले खरोखर आनंदी
करीं तयाच्या करा ठेवुनी क्रमितां पथ त्याच्या छंदी,
स्वर्गासम हि धरा होय हो निर्मलदिव्यसुखस्पन्दी
पुढें तरी हे करा गडयांनो, झाले मागें ते झाले,
आयुमार्गातुनी चालतां वर्ष पुरे होउन गेलें ... ५
---- ना. वा. टिळक