मराठी
६२७. लहान मुलाचा मृत्यू
हा बाळ जशी माळ फुलांची ताजी,
प्रिय तुला फार देवाजी ... ध्रु
तूं दिधली हि, तूंच, दयाळा, नेली,
तव चरणी प्रेमें रमली
हिज उष्णाची भीती नसे बा उरली
मृतिझंझातून हि सुटली
किती थोर दया तव तरी
ह्या, देवा, बाळावरी
तूं ठेवियलें ह्या न संकटामाजीं,
स्तवु किती तुला, बापाजी ... १
हा कंठींचा हार तुटोनि पडला,
मणी किंवां मीने गिळिला
किती मोहाने व्यर्थ कल्पना येति
हृदयाला ज्या जाळिती
तव निर्मल आत्मबलाने
हा मोह दूर तूं ने ने
हे जगदीशा, तव इच्छेला राजी
कर आम्हां, सदया, आजी ... २
---- ना. वा. टिळक