मराठी
६३७. प्रभूच्या भेटीची उत्कंठा
हसणें, रडणे, जागत बसणें,
निजणें यांच्या पलीकडे
जाईनच, मी जाईन,
लौकर निघुनी जाईन
नको पेरणें, नको राखणें,
नको कापणे मज जिकडे
प्रेम, विसावा, गृह याची
मधूर , मधुर आशा साची
प्रभो, कशाचा विलंब आतां
ये , ये, धावून येई गडे,
ये , ये, धावून येई गडे,
ये , ये, धावून येई गडे,... १
फुलणें किवां कोमून जाणें
या दोहींच्या पलीकडे
जाईनच, मी जाईन,
लौकर निघुनी जाईन
प्रकाश नलगे, छाया नलगे,
आशा भय नाहीं जिकडे
प्रेम, विसावा, गृह याची
मधुर, मधुर आशा साची
प्रभो, कशाचा विलंब आतां
ये , ये, धावून येई गडे,
ये , ये, धावून येई गडे,
ये , ये, धावून येई गडे,... २
उदयास्ताच्या, सांत्वन आणि
यांचिया पलीकडे
जाईनच मी जाईन
लौकर निघुनी जाईन
अठवण धरणें आणि विसरणें
दोन्ही सुटली मज जिकडे
प्रेम, विसावा, गृह याची
मधुर, मधुर आशा साची
प्रभो, कशाचा विलंब आतां
सत्वर, धावून येई गडे,
सत्वर, धावून ये रे, सख्या,
सत्वर, धावून येई गडे,,... ३
गोळा करणे आणि विखरणें
या दोहींच्या पलीकडे
जाईनच मी जाईन
लौकर निघुनी जीन
नको वाढणें, कमती होणें,
येणें, जाणें मज जिकडे
प्रेम, विसावा, गृह याची
मधूर , मधुर आशा साची
प्रभो, कशाचा विलंब आतां
भेट, धावून येई गडे,
येई , धावून येई गडे,
भेट , धावून येई गडे,... ४
सोडून जाणें, पुन्हा भेटणें
या दोहींच्या पलीकडे
जाईनच मी जाईन,
लौकर निघुनी जाईन
निरोप देणे, स्वागत करणें,
खचणें, हसणें, नच जिकडे
प्रेम, विसावा, गृह याची
मधूर , मधुर आशा साची
प्रभो, कशाचा विलंब आतां
सत्वर दर्शन देई गडे,
सत्वर दर्शन दे दे, ख्रिस्ता,
सत्वर दर्शन देईं गडे ... ५
शरीरयात्रा आणि यातना
ह्या अवघ्याच्या पलीकडे
होईनच मी होईन,
लौकर क्षणात होईन
खडक, नदी नच, आज उद्या हा
हिशेब लगे मज जिकडे
प्रेम, विसावा, गृह याची
मधुर, मधुर आशा साची
प्रभो कशाचा विलंब आतां
धर हृदयी मज धाव गडे,
धर धर हृदयिं, प्राणविसाव्या
ये ये धावून ये इकडे ... ६
---- ना. वा. टिळक