६६२. चाल करुन पुढे जाणे

मराठी

६६२. चाल करुन पुढे जाणे चला, चला रे, चला पुढें, प्रभू नेईल जाऊ तिकडे चला पुढे व्हा, चला गडे, प्रभू नेईल जाऊ तिकडे ...ध्रु तुडवा राने, तुडवा डोंगर, फोल डबुकले, लंघा सागर, पळवा विघ्नें चहुंकडे चला पुढें व्हा, चला गडे ... १ मोह कशाचे घडेच जैसे हे मातीचे लाथेसरसे करा करा पाहू तुकडे चला पुढें व्हा, चला गडे ...२ चला म्हणा जेन भेटे त्याला, बंधुभगिनीला, सर्व जगाला घ्या पंगुना बघूं कडे चला पुढें व्हा, चला गडे ...३ उंच उंच अति उच्चस्थानी नेऊं अवघे जग उचलोनि, पवित्रता, सुख, जय तिकडे चला पुढें व्हा, चला गडे ...४ गाठू, चला, ती अतर्क्य उंची, इच्छा पुरवूं प्रभुरायाची बळे तयाच्या सर्व घडे, चला पुढें व्हा, चला गडे ... ५ गर्जा पाहूं जयजय जयजय गेलें, मेले दुरितदु:खभय मृत्यू रडे हा प्रभूपुढें चला पुढें, तुम्ही चला गडे ... ६ ----- ना. वा. टिळक